नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात सरकारने गरीब लोकांसाठी मोफत रेशनची योजना सुरू केली होती. नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मोफत रेशनची ही योजना ३० नोव्हेंबरनंतर चालणार नाही.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) च्या विस्ताराचा कोणताही प्रस्ताव सध्या अन्न मंत्रालयाकडे आला नाहीय. केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. त्यामुळे मोफत रेशन देण्याची योजना पुढे चालू ठेवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
सरकारी गोदामांमध्ये पुरेसा अन्नधान्याचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे खुल्या बाजार विक्री योजना (OMSS) देखील यावर्षी चांगली कामगिरी करत आहे. व्यापारी आस्थापना आणि अन्न प्रक्रिया उद्योगात तृणधान्यांना मोठी मागणी आहे. खाद्यतेलाच्या घसरलेल्या किमतींबाबत पांडे शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी (PMGKAY) बाबत ही माहिती दिली. मोठ्या ग्राहकांना खुल्या विक्री योजनेंतर्गत शासकीय गोदामातून धान्य मिळते. यामुळे देशांतर्गत बाजारातील महागाई नियंत्रणात राहण्यास मदत होते.
खरं तर, कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटात गरिबांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती, जी नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या अंतर्गत देशातील ८१ कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक ग्राहकाला पाच किलो रेशन मोफत दिले जात आहे. ही योजना गेल्या वर्षी मार्चमध्ये जाहीर करण्यात आली होती, जी एप्रिल ते जून २०२० या कालावधीत लागू करण्यात आली होती. पण नंतर ही योजना नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली होती.
गरीब कल्याण योजना या योजनेंतर्गत, सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ओळखल्या गेलेल्या ८१ कोटी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केले. रेशन दुकानांमधून वाटप केलेल्या धान्याबरोबरच हे धान्यही वाटण्यात आले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रित करण्यासाठी, सरकार OMSS अंतर्गत मोठ्या प्रमाणात ग्राहकांना तांदूळ आणि गहू पुरवते.
अर्थव्यवस्थेतील सुधारणा लक्षात घेऊन केंद्र सरकारने घेतला निर्णय
अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की, आमची अर्थव्यवस्था सुधारत आहे आणि खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत अन्नधान्याचा पुरवठाही चांगला झाला आहे. हे पाहता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसोबत पुढे जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
काय होती पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दर महिन्याला ५ किलो तांदूळ किंवा गहू दिला जातो. ८१ कोटी लोकांना त्याचा लाभ मिळत आहे.
- योजनेंतर्गत दरमहा १९.४ कोटी कुटुंबांना १ किलो हरभरा मोफत दिला जात आहे.
- या योजनेंतर्गत २० कोटी जनधन खाती आणि ३ कोटी वृद्ध, गरीब विधवा आणि अपंगांना रोख रक्कम देण्यात आली.
- २०.९७ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजसह पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर करण्यात आली होती.