
मुंबई : महाराष्ट्र सरकारने एमबीबीएस अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी भाषेत प्रकाशित करण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. मध्य प्रदेश सरकारने अलीकडेच हिंदीमध्ये एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी) अभ्यासक्रमांसाठी पुस्तके प्रकाशित केली आहेत.
अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीचे अध्यक्ष अजय चंदनवाले, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग असतील. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही मध्य प्रदेशातील अधिकाऱ्यांशी बोललो ज्यांनी एमबीबीएस अभ्यासक्रमाची पुस्तके हिंदीत छापली आहेत. यापुढील टप्पा म्हणजे समितीच्या सदस्यांची महाराष्ट्रात पहिली बैठक घेऊन मराठीत पुस्तके प्रकाशित करण्याच्या पद्धतींवर चर्चा करणे हे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यात मुंबईत बैठक होऊ शकते.
यूपीच्या योगी सरकारने वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण हिंदी अभ्यासक्रमात करण्याची घोषणा आधीच केली आहे. देशात प्रथमच मध्यप्रदेशात हिंदी आवृत्तीत वैद्यकीय अभ्यासाबाबत पाऊल उचलण्यात आले. तेव्हापासून त्याची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारनेही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मध्यप्रदेशातील अनेक डॉक्टरांनीही हिंदीत औषधांचे प्रिस्क्रिप्शन दाखवायला सुरुवात केली आहे.