पाकिस्तान क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग ही नवीन गोष्ट नाही. या दलदलीत पाकिस्तानचे अनेक खेळाडू अडकले आहेत. दरम्यान पाकिस्तानचा आणखी एक अनुभवी खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे, ज्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर 2 वर्षांची बंदी घातली आहे. ऑफस्पिनर आसिफ आफ्रिदीला (Asif Afridi) भ्रष्टाचारविरोधी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर पीसीबीने ही शिक्षा दिली आहे.
आसिफची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघात निवड झाली होती, पण त्याला राष्ट्रीय संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मॅच फिक्सिंगमध्ये दोषी असलेल्या या खेळाडूवर 12 सप्टेंबर 2024 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पीसीबीचे म्हणणे आहे की, आता हा खेळाडू पुढील दोन वर्षे देशांतर्गत क्रिकेट किंवा पीएसएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही.
Asif Afridi banned from all cricket for two years on corruption charges
Read more: https://t.co/SSkfWuDrTr#cricket #Pakistan pic.twitter.com/pDTEMzF7le
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) February 7, 2023
आसिफ आफ्रिदीने गेल्या वर्षी काश्मीर प्रीमियर लीगमध्ये रावलकोट हॉक्सकडून खेळताना मॅच फिक्सिंग केले होते. आफ्रिदीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आपल्या ऑफ-स्पिन गोलंदाजीने 35 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 118 बळी घेतले आहेत. आसिफच्या नावावर लिस्ट ए मध्ये 59 विकेट्स आहेत, तर टी-20 मध्ये या खेळाडूने आतापर्यंत 63 विकेट घेतल्या आहेत. तो पीएसएलमध्ये मुलतान सुलतानकडून खेळला आहे.
याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ यांच्यावर 2010 च्या इंग्लंडमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. दोन वर्षांनंतर लेग-स्पिनर दानिश कनेरियावर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी इंग्लिश काउंटी क्रिकेटमधून आजीवन बंदी घालण्यात आली होती. अलीकडच्या काळात उमर अकमल, शर्जील खान, खालिद लतीफ, शाहजेब हसन, मोहम्मद नवाज आणि मोहम्मद इरफान यांच्यावरही विविध स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बंदी घालण्यात आली होती.