ICC Champions Trophy 2025 AFG vs ENG: इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर

WhatsApp Group

AFG vs ENG Champions Trophy:अफगाणिस्तानने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला हरवून अफगाणिस्तानने मोठा अपसेट निर्माण केला आहे. या विजयासह, अफगाणिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे तर इंग्लंडचा संघ अंतिम-४ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सलामीवीर इब्राहिम झद्रानच्या १७७ धावांच्या मदतीने ५० षटकांत ७ गडी गमावून ३२५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ ५० षटकांत ४९.५ षटकांत ३१७ धावांवर सर्वबाद झाला आणि अफगाणिस्तानने ८ धावांनी सामना जिंकला.

इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा रोमांचक सामना ‘करो या मरो’ असा होता. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानने विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे, तर इंग्लंड पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडणारा इंग्लंड हा तिसरा संघ आहे. यापूर्वी, यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांनी ग्रुप अ मधून आधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता ग्रुप-ब मधील २ सेमीफायनल संघांचा निर्णय अजून बाकी आहे. उपांत्य फेरीतील दोन स्थानांसाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. ग्रुप बी मध्ये, दक्षिण आफ्रिका ३ गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर विश्वविजेता ऑस्ट्रेलिया तेवढ्याच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये फक्त नेट रन रेटचा फरक आहे. २ सामन्यांतील पहिल्या विजयानंतर अफगाणिस्तान २ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या पराभवासह इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडला आहे.