
मुंबई: पालिकेने स्थानिक पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे तसेच अतिरिक्त दराने पाणी पुरवठा करुन नागरिकांची लूट करणाऱ्या टँकर माफियांची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.
एल (पश्चिम), मुलुंड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, स्थानिक लोकांच्या पाण्याची समस्या पालिकेने तातडीने सोडवावी तसेच पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या यंत्रणेने शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाणी टँकर पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी.
पाणीप्रश्न, घरदुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, नादुरुस्त पथदिवे आदी 348 विविध विषयांवर नागरिकांनी तक्रार अर्ज दिले, तर 78 अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.
‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम दि. 14 ऑक्टोबर रोजी एम ईस्ट वॉर्ड गोंवडी (पूर्व) येथे सकाळी 10 वाजता सुरू होईल. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in, बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in या लिंकवरही ऑनलाइन तक्रार करता येईल.