
Bharat Jodo Yatra In Maharashtra: राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. हिंगोली येथे शुक्रवारी (11 नोव्हेंबर) त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली. गुरुवारी यात्रेच्या 64 व्या दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे याही राहुल गांधींसोबत नांदेडमध्ये यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हेही सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार होते, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते सहभागी झाले नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी (10 नोव्हेंबर) सांगितले की, त्यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने ते यात्रेला उपस्थित राहणार नाहीत.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार @AUThackeray जी भारत जोडो यात्रेमध्ये @RahulGandhi जी यांच्या सोबत सहभागी झाले आहेत. सोबत आहेत, शिवसेना नेते, विधान परिषद विरोधी पक्षनेते @iambadasdanve, विधान परिषदेचे आमदार @AhirsachinAhir आणि इतर अनेक सहकारी आणि शिवसैनिक. pic.twitter.com/aKwxVToSNv
— Shivsena Communication (@ShivsenaComms) November 11, 2022
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ हे कटुतेचे वातावरण संपवून देशाला एकत्र आणण्याचे आंदोलन आहे, असे उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी (10 नोव्हेंबर) सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत त्यांच्या घरी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी ही माहिती दिली.
तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. तामिळनाडूनंतर ही पदयात्रा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रात पोहोचली आहे. ही यात्रा राज्यातील 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. यादरम्यान 382 किमी अंतर कापले जाईल. ही यात्रा 20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात दाखल होणार आहे.