सिडनी: बिग बॅश लीगमध्ये (BBL) सिडनी सिक्सर्सकडून खेळताना पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने मोलाची खेळी केली खरी, पण त्याच्या संथ फलंदाजीमुळे तो पुन्हा एकदा टीकेचा धनी ठरला आहे. मेलबर्न रेनेगेड्स विरुद्धच्या सामन्यात बाबरने अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला, मात्र ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट याने बाबरच्या ‘बॅटिंग अप्रोच’वर थेट शब्दांत प्रहार केला आहे. लाईव्ह कॉमेंट्री दरम्यान गिलख्रिस्टने बाबरच्या मर्यादा स्पष्ट करत त्याला चांगलेच सुनावले.
विजयात वाटा, पण स्ट्राईक रेटचा पेच
मेलबर्न रेनेगेड्सने दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बाबर आझमने ४६ चेंडूंमध्ये ५८ धावांची खेळी केली. तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिल्याने सिडनी सिक्सर्सने ६ गड्यांनी विजय नोंदवला. बीजीएलमधील हे त्याचे पहिलेच अर्धशतक ठरले. मात्र, बाबर ज्या पद्धतीने धावा करत होता, ते पाहून गिलख्रिस्ट नाराज झाला. आधुनिक टी-२० क्रिकेटमध्ये ४६ चेंडूंमध्ये केवळ ५८ धावा करणे हे संघासाठी फायद्याचे की तोट्याचे, असा प्रश्न गिलख्रिस्टने उपस्थित केला.
Adam Gilchrist also called out Babar Azam slow batting in T20s during today’s match.
• His limited power range restricts his boundary options.
• He must be proactive himself, not outsource the SR.
• His run-a-ball approach unfairly pressures his partner to take risks. pic.twitter.com/ahfYJNgSyO— The PCT Army.🇵🇰 (@thepctarmy) January 1, 2026
‘दुसऱ्या फलंदाजावर दबाव आणणारी फलंदाजी’
ॲडम गिलख्रिस्टने कॉमेंट्री बॉक्समधून बोलताना सांगितले की, बाबरची पॉवर रेंज अत्यंत मर्यादित आहे. तो मोठे फटके मारण्यापेक्षा एकेरी-दुहेरी धावांवर अधिक भर देतो, ज्यामुळे दुसऱ्या बाजूने खेळणाऱ्या फलंदाजावर अनावश्यक दबाव निर्माण होतो. गिलख्रिस्टच्या मते, जेव्हा एक फलंदाज संथ खेळतो, तेव्हा दुसऱ्या फलंदाजाला धावगती राखण्यासाठी मोठी जोखीम पत्करावी लागते आणि यातच विकेट जाण्याची शक्यता वाढते. “बाबरने स्वतःच्या स्ट्राईक रेटवर काम करणे गरजेचे आहे, तो केवळ स्ट्राईक रोटेट करून आपली जबाबदारी झटकू शकत नाही,” अशा कठोर शब्दांत गिलख्रिस्टने त्याचे वाभाडे काढले.
सिक्सर्सचा विजय आणि बाबरची साथ
सिडनी सिक्सर्सची सुरुवात चांगली झाली होती. डॅनियल ह्यूजेस (३०) आणि जोश फिलिप (१६) लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार मोइजेस हेन्रिक्सनेही निराशा केली. अशा स्थितीत बाबरने एक बाजू लावून धरली. त्याला शेवटच्या षटकांमध्ये जोएल डेव्हिसची मोलाची साथ लाभली. डेव्हिसने अवघ्या १५ चेंडूंमध्ये ३४ धावा कुटल्या, ज्यामुळे बाबरच्या संथ खेळीचा फटका संघाला बसला नाही आणि सिडनीने विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र, या विजयानंतरही बाबरच्या ‘ओल्ड स्कूल’ फलंदाजीवर क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
