
केरळ उच्च न्यायालयाने अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर आणि त्यांच्या एका कर्मचाऱ्याला दिलासा दिला आहे. तिघांविरुद्ध दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील फौजदारी कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती झियाद रहमान एए यांनी लिओनी यांच्यावरील खटला रद्द करण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला. या याचिकेच्या सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत न्यायालयाने फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील एका इव्हेंट मॅनेजरने सनी लिओनी, तिचा पती आणि कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि परफॉर्म करण्यासाठी लिओनीला लाखो रुपये देण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला होता, तरीही अभिनेत्री आली नाही. त्यानंतर, राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेने सनी आणि इतर दोघांविरुद्ध चार वर्षांपूर्वी कोझिकोडमध्ये स्टेज परफॉर्मन्ससाठी कंपनीसोबत केलेल्या कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याच्याविरुद्ध कलम 406, 420 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सनी, तिचा पती आणि कर्मचारी या तिघांनीही उच्च न्यायालयात धाव घेत आपण निर्दोष असून कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली. आपल्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसतानाही या खटल्याच्या प्रक्रियेदरम्यान तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे, असेही अभिनेत्रीने म्हटले आहे.
याचिकेत असेही म्हटले आहे की तक्रारदाराने याच आरोपांसह दिवाणी खटला दाखल केला होता, जो जुलै 2022 मध्ये पुराव्याअभावी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला होता. या सर्व गोष्टींबाबत त्यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्याची मागणी केली होती.