रकुल प्रीत करतेय जॅकी भगनानीला डेट, वाढदिवसादिवशी पोस्ट शेअर करत दिली कबूली
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या वाढदिवसानिमित्त निर्माता जॅकी भगनानीसोबतचं आपलं नातं जगासमोर आणलं आहे. आपल्या 31 व्या वाढदिवसानिमित्त रकुलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. जॅकीनेही त्यांच्या नात्याबद्दल एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की रकुल हे त्याचे संपूर्ण जग आहे.
जॅकीने आपल्या पोस्टमध्ये रकुलचा हात धरून एक फोटो टाकला आहे. या फोटोत दोघेही एकमेकांकडे बघून हसताना दिसत आहेत. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, ‘माझे दिवस तुझ्याशिवाय अपूर्ण वाटतात. तुज्याशिवाय स्वादिष्ट जेवणही बेचव लागतं. तू माझं जग आहेस, जगातील सर्वात सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’
रकुल प्रीत सिंहने तिच्या इन्स्टाग्रामवर तोच फोटो शेअर करून जॅकी भगनानीला प्रत्युत्तर दिले आहे. ‘हे नातं हेचं आपल्या वाढदिवसाची सर्वात मोठी भेट म्हणून तीने वर्णन करताना लिहिलंय की, ‘तू माझं या वर्षातील सर्वात मोठं गिफ्ट आहेस. माझ्या आयुष्यात रंग भरल्याबद्दल आणि मला हसवल्याबद्दल धन्यवाद. जसा आहेस, तसाच राहिल्यामुळे थँक्यू. अजून एकत्र आठवणी बनवूया.’
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या नात्यावर बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयुष्मान खुराना, सोफी चौधरी, राशी खन्ना, टायगर श्रॉफ, जॅकलिन फर्नांडिस इत्यादी स्टार्सनी दोघांनाही त्यांच्या नात्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रकुल प्रीत सिंग तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलत नाही. बऱ्याच वेळा तिला तिच्या अफेअरबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते पण ती याबद्दल कधीच बोलली नव्हती.
रकुल प्रीत सिंगने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. यानंतर तीने कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. 2014 मध्ये ‘यारियां’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.