हॅप्पी बर्थडे नुसरत जहाँ: खासदारकी, लग्न, काडीमोड ते बाळाचे वडील कोण? करिअरपेक्षा खाजगी आयुष्यच चर्चेत

WhatsApp Group

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नुसरत जहाँ या तृणमुल काँग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या. संसदेतील त्यांचा ग्लॅमरस लूक ते त्यांचे प्रेमसंबंध, लग्न आणि घटस्फोट यामुळे त्या कायम चर्चेत होत्या. ‘यीशान’ या त्यांच्या मुलाचे वडील कोण यावरुनही त्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होत्या.बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांचा आज वाढदिवस आहे. ८ जानेवारी १९९० मध्ये कोलकात्यात त्यांचा जन्म झाला. २०१० साली मॉडलिंग क्षेत्रातून त्यांनी आपल्या करिअरची सुरवात केली. त्यानंतर त्यांनी बंगाली फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीपेक्षा खाजगी आयुष्यामुळे त्या कायम चर्चेत असतात. अभिनेत्री ते पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमुल काँग्रेसच्या खासदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवासाला अनेक वादांची किनार आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी कादिर खानशी नाव जोडलं गेल्यामुळे नुसरत जहाँची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. २०१२ मध्ये बॉयफ्रेन्ड कादिरसोबत त्या निकाह करणार असल्याचीही चर्चा होती. हे नातं पुढे फार काळ टिकू शकलं नाही. २०१९ मध्ये विदेशात निखिल जैनशी त्यांनी लग्न केलं होतं. मात्र, त्यानंतर वर्षभरातच हे लग्न अवैध असल्याचं सांगत ही लग्नगाठ मोडली. हे लग्न भारतीय कायद्यानुसार झालं नसल्याचं स्पष्टीकरण नुसरत यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांची प्रेग्नन्सी आणि बाळाचे वडील कोण यावरुनही उलटसुलट चर्चा सुरु होत्या. दरम्यानच्या काळात अभिनेता यश दासगुप्ताशी त्यांचं सूत जुळलं.

बंगालच्या बशीरहाट मतदारसंघातून नुसरत यांनी २०१९ लोकसभा निवडणूक लढवली होती. ही निवडणूक त्यांनी तब्बल ३.५ लाख मतांनी जिंकली होती. संसद परिसरात अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांच्यासोबत वेस्टर्न कपड्यांमध्ये फोटोशूट केल्यानं या दोघींनाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. याच दरम्यान कपड्यांचे व्यापारी निखिल जैनसोबत नुसरत यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नानंतर नाव किंवा धर्म न बदलता हिंदू रितीरिवांजाप्रमाणे दुर्गा पूजा केल्यानंतर मुस्लीम धर्मगुरुंकडून नुसरत यांच्यावर टीका करण्यात आली. २०१९मध्ये दूर्गा देवीच्या रुपात फोटोशूट केल्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

‘फेयर वन मिस कोलकाता’ ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर ‘शोत्रू’ या चित्रपटातून नुसरत यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘खोका ४२०’, ‘खिलाडी’ या चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ‘चिकन तंदुरी’ आणि ‘देसी छोरी’ हे आयटम साँग ब्लाकबस्टर हीट ठरले. ‘जमाई ४२०’, ‘ब्योमकेश’, ‘पावर’, ‘केलोर किर्ती’, ‘लव एक्सप्रेस’s सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.

– रेणुका शेरेकर