नवी दिल्ली – आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात एबीपी आणि सी व्होटरचा ( ABP-CVoter Survey) सर्व्हे समोर आला आहे. सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेश आणि गोव्यामध्ये भाजप पुन्हा आपलं पुन्हा सरकार बनवणार आहे. तर दुसरीकडे मणिपूर-उत्तराखंडमध्ये भाजपला काँग्रेसकडून तगडं आव्हान मिळू शकतं. पंजाबमध्ये भाजपला फारसं यश मिळणे कठीण आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर!
एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणात असे सांगण्यात आले आहे की यावेळी भाजपला 100 पेक्षा जास्त जागांचा फटका बसू शकतो. 403 जागांच्या यूपी विधानसभेत भाजपला 217 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
उत्तराखंडमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये चुरशीची लढत
एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणात उत्तराखंडमधील एकूण 70 जागांपैकी भाजपला 38 जागा मिळू शकतात. दुसरीकडे, काँग्रेसला 32 जागा मिळू शकतात. म्हणजेच येथे भाजपला काँग्रेसकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्यांदाच उत्तराखंडमध्ये सर्व जागांवर निवडणूक लढवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला एकही जागा मिळणं कठीण आहे.
गोव्यात भाजपचं सरकार कायम राहणार
गोवा विधानसभा निवडणुकीवरील एबीपी-सी व्होटरच्या मतदारांच्या तिसऱ्या सर्वेक्षणात, काँग्रेसला 18.6%, भाजपला 35.7%, आपला 23.6% आणि इतरांना 22.1% मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विधानसभा जागांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, 40 जागांच्या या विधानसभेत काँग्रेसला 2-6 जागा, भाजपला 19-23 जागा, आप 3-7 जागा आणि इतरांना 8-12 जागा मिळण्याची शक्यता आहे.
मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस
60 विधानसभेच्या जागा असलेल्या मणिपूरमध्ये आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. मणिपूरमधील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 33.1 टक्के, भाजपला 38.7 टक्के, एनपीएफला 8.8 टक्के आणि इतरांना 19.4 टक्के मते मिळतील. विधानसभा जागांच्या बाबतीत बोलायचे झाले तर काँग्रेसला 20-24 जागा, भाजपला, 25-29 जागा एनपीएफला 4-8 आणि इतरांना 3-7 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पंजाबमध्ये ‘आप’ सर्वांना देणार धोबीपछाड
117 विधानसभा जागा असलेल्या पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 2017 च्या निवडणुकीत फक्त 20 जागा मिळाल्या होत्या, मात्र 2022 च्या निवडणुकीत ABP-C वोटरच्या तिसऱ्या सर्वेक्षणात आप 51 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 2017 च्या निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली 77 जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाला 42 ते 50 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे कारण या सर्वेक्षणावर विश्वास ठेवला तर राज्यात भाजपला खाते उघडणेही कठीण होईल. आणि अकाली दलला फक्त 16 ते 24 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे.