मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण; 2023 अखेर प्रकल्प पूर्ण होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group

मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोडचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षाअखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई कोस्टल रोडच्या प्रगतिपथावर असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

प्रकल्पाच्या प्रियदर्शिनी उद्यान (नेपियन सी) येथील कार्यालयात मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. मुंबईकरांसाठी स्वप्नवत असलेला हा प्रकल्प वेळेत पूर्ण करुन त्यांचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रियदर्शिनी पार्क येथील भूमिगत बोगदा, हाजी अली आणि वरळी येथील आंतरमार्गीका बदल (इंटरचेंज) सह संपूर्ण प्रकल्प रस्त्याची पाहणी केली.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता प्रकल्प) (प्रभारी) मांतय्या स्वामी यांच्यासह संबंधित अधिकारी  उपस्थित होते.