Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! एकाच वर्षात 7 वेळा शून्यावर बाद; रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
Abhishek Sharma 7th Duck In 2026: भारतीय क्रिकेटमधील आक्रमक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक शर्मासाठी २०२६ हे वर्ष कमालीच्या चढ-उतारांचे ठरत आहे. फलंदाजीतील सातत्याच्या अभावामुळे तो सध्या टीकेचा धनी बनला असून, मैदानावर शून्यावर बाद होण्याचा त्याचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ‘गोल्डन डक’वर बाद होताच अभिषेकच्या नावावर एका अनचाही विक्रमाची नोंद झाली आहे.
जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर शिकार
आयपीएल २०२६ मधील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो जोफ्रा आर्चरच्या जाळ्यात अडकला. आर्चरच्या वेगवान चेंडूवर त्याने आक्रमक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण टायमिंग चुकल्याने बाउंड्रीजवळ उभा असलेल्या रवी बिश्नोईने त्याचा झेल टिपला. या ‘गोल्डन डक’मुळे अभिषेकची २०२६ मधील खराब कामगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
शून्याशी जळली नाती; २०२६ मधील सातवा ‘डक’
अभिषेक शर्मासाठी हे वर्ष ‘झिरो’चे वर्ष ठरत आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यासहित या एकाच वर्षात तो तब्बल ७ वेळा शून्यावर बाद झाला आहे. यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध २ वेळा, टी-२० वर्ल्ड कपमध्ये ३ वेळा आणि आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि आता राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रत्येकी १ वेळा तो खाते न उघडता बाद झाला आहे. विशेष म्हणजे, या ७ पैकी ४ वेळा तो पहिल्याच चेंडूवर (गोल्डन डक) बाद झाला असून त्याच्या एकूण टी-२० कारकिर्दीत तो आतापर्यंत १६ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
रोहित शर्मा आणि संजू सॅमसनला मागे टाकले
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अभिषेकने आता अव्वल स्थान गाठले आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि संजू सॅमसन यांच्या नावावर एका वर्षात ६ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम होता. अभिषेकने ७ व्यांदा शून्यावर बाद होऊन हा रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे तज्ज्ञांकडून टीका केली जात असली, तरी त्याच्या क्षमतेवर कोणाचेही दुमत नाही. मात्र, आता त्याला आपल्या तंत्रात बदल करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
