Aadhaar Card Update | तर भरावा लागेल दंड…या तारखेपर्यंतच मिळेल मोफत सेवा

WhatsApp Group

आधार कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा पुरावा म्हणून आधार कार्ड सादर करणं गरजेचं आहे. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अपडेट असणं गरजेचं आहे. तुमच्या आधार कार्डवरील माहिती किंवा घरचा पत्ता जर अपडेट नसेल किंवा जर तुम्ही अद्याप तो अपडेट केला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण यूआयडीएआयने आधारकार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी 14 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. 14 मार्चपर्यंत तुम्ही ही माहिती मोफत अपडेट करू शकता. या कालावधीत तुमच्याकडून कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही, असं सूत्रांनी सांगितलं आहे. आधार कार्डावरील पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे, ते सविस्तर जाणून घेऊया.

आधारकार्डधारकांना या कार्डवरची माहिती नि:शुल्क अपडेट करण्यासाठी यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाकडून संधी देण्यात आली आहे. 14 मार्चपर्यंत या कामासाठी कार्डधारकांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. आधारकार्ड हा महत्त्वाचा दस्तऐवज असून, त्याची केव्हाही गरज पडू शकते. अशा वेळी त्यावरची माहिती अपडेट असणं गरजेचं आहे. याच अनुषंगाने यूआयडीएआयनं भारतीय नागरिकांना त्यांचा आधार कार्डवरचा पत्ता अपडेट करण्यासाठी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता हे काम अगदी घरबसल्या करता येणार आहे. जर तुम्ही हे काम दोन आठवड्यांनंतर केलं तर तुम्हाला यासाठी फी भरावी लागू शकते. पण हे काम 14 मार्चपूर्वी केलं तर त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.

तुम्ही जर 14 मार्चपर्यंत घरबसल्या आधार कार्ड अपडेट करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी सर्वप्रथम https://myaadhar.uidai.gov.in या आधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि नोंदणीकृत क्रमांकावर आलेल्या ओटीपीच्या मदतीने लॉगिन करावं लागेल. लॉगिन केल्यावर Name/Gender/Date Of Birth & Address Update हा पर्याय निवडावा लागेल.  त्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या Update Aadhaar Online या पर्यायावर क्लिक करावं लागेल. डेमोग्राफिक पर्यायाच्या लिस्टमधील address हा पर्याय निवडून नंतर Proceed to Update Aadhaar वर क्लिक करावं लागेल. हे क्लिक केल्यावर आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करून नवीन रहिवासी पत्ता लिहावा लागेल. यासाठी विनाशुल्क तुमची रिक्वेस्ट सबमिट होईल. त्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट क्रमांक अर्थात एसआरएन मिळेल. या क्रमांकाच्या मदतीनं तुम्ही तुमच्या रिक्वेस्टचं स्टेटस तपासू शकता.