बिहारच्या मोतिहारीमध्ये चालत्या ट्रेनला आग, प्रवाशांनी उडी मारून जीव वाचवला

WhatsApp Group

बिहारमधील मोतिहारी येथे रविवारी एका पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला आग लागली. यावेळी ट्रेनमध्ये प्रवासी देखील उपस्थित होते. सकाळी 6.10 वाजता रक्सौलहून नरकटियागंजला जाणाऱ्या ट्रेनला हा अपघात झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली. यादरम्यान प्रवाशांनीही ट्रेनमधून उड्या मारल्या आणि धावपळ सुरू केली.

ट्रेनजवळ उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनीही बोगीत पोहोचून लोकांना खाली उतरवले. यानंतर इंजिनला जोडलेल्या बोगी वेगळ्या करण्यात आल्या. आता या बोगींना दुसरे इंजिन जोडून नरकटियागंजपर्यंत नेण्याची तयारी सुरू आहे. प्रवासीही पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

05541 पॅसेंजर ट्रेन रक्सौल जंक्शन येथून दररोज पहाटे 5:10 वाजता सुटते. दरम्यान, रविवारी ट्रेन रक्सौलमधील भेलाहीच्या पुल क्रमांक 39 जवळ आली असता अचानक आग लागली. तेथे उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी धूर पाहिल्यानंतर रेल्वेच्या इंजिनला आग लागल्याचे दिसून आले. मात्र, जवानांच्या हुशारीमुळे मोठी दुर्घटना टळली. कर्मचाऱ्यांनी वेळीच रेल्वेचे इंजिन बोगीपासून वेगळे केले, त्यामुळे दुसऱ्या बोगीला आग लागली नाही.