IND vs WI: पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा रोमहर्षक विजय, वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव

WhatsApp Group

IND vs WI 1st ODI: त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या ODI मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी 15 धावांची गरज होती, पण विंडीजचा संघ केवळ 11 धावाच करू शकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 7 गडी गमावून 308 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 50 षटकांत 6 गडी गमावून 305 धावाच करू शकला.

वेस्ट इंडिजकडून काइल मेयर्सने सर्वाधिक 75 धावा केल्या. ब्रूक्सने 46 धावा केल्या. ब्रँडन किंगने 66 चेंडूत 54 धावा केल्या. कर्णधार निकोलस पूरन 25 धावा करून बाद झाला. अकील हुसेन 33 आणि शेफर्ड यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. भारताकडून सिराजने 2, चहलने 2 आणि ठाकूरने 2 बळी घेतले.

भारताकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने 64 धावा करून पुनरागमन केले तर कर्णधार शिखर धवनचे शतक तीन धावांनी हुकले, परंतु या दोघांनी शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताला 7 बाद 308 अशी मजल मारली. शिखर आणि शुभमन गिल यांनी सलामीच्या भागीदारीत भारताला 119 धावांची सुरेख सुरुवात करून दिली. गिल 53 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 64 धावा करून बाद झाला. त्यानंतर शिखरने श्रेयस अय्यरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. शिखर त्याच्या शतकापासून अवघ्या तीन धावा दूर असताना झेलबाद झाला. शिखरने 99 चेंडूत 97 धावा करताना 10 चौकार आणि तीन षटकार ठोकले.

शिखर बाद झाल्यानंतर काही वेळातच अय्यरची विकेट पडली. अय्यरने 57 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. सूर्यकुमार 13 आणि संजू सॅमसन 12 धावा करून बाद झाले. 252 धावांवर भारताने पाचवी विकेट गमावली.

दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी करत भारताला 300 च्या जवळ नेले. 49व्या षटकात अल्झारी जोसेफने दोन्ही फलंदाजांना आपली शिकार बनवले. शार्दुल ठाकूरने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताला 308 धावांपर्यंत नेले. शार्दुल सात धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून जोसेफ आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.