शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला ट्रकची धडक… 7 विद्यार्थी ठार, 2 गंभीर

WhatsApp Group

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात गुरुवारी ट्रकने धडक दिल्याने ऑटो रिक्षात प्रवास करणाऱ्या 7 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोरेर पोलिस स्टेशन परिसरात ट्रकने धडक दिल्याने सात शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. सर्व मुले 5 ते 8 वयोगटातील होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी शाळेत शिकणारी आठ शाळकरी मुले ऑटोरिक्षाने आपल्या घरी जात होती. शाळकरी मुले जात असताना त्यांच्या रिक्षाला ट्रकने धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की ऑटोचा चक्काचूर झाला.

2 जखमी विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू 

मुलांनी बीएसएनएन डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. कोरेर येथील चिल्हाटी चौकाजवळ गुरुवारी हा अपघात झाला. या अपघातात पाच मुलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन मुले आणि रिक्षाचालक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले असून मृतदेह आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अन्य दोन जखमी विद्यार्थ्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी आणखी एक विद्यार्थी आणि रिक्षाचालकावर उपचार सुरू आहेत.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करून विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. बघेल यांनी प्रशासनाला जखमींना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी ट्विट करून लिहिले की, ही बातमी अत्यंत दु:खद आहे. आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.