A Quiet Place शांततेचा कर्कश आवाज…

WhatsApp Group

सायलेंट चित्रपटाचा काळ जाऊन बरीच दशके लोटली. चित्रपट व्यवसाय अगदी प्राथमिक अवस्थेत असताना तांत्रिक अवकाश अगदीच मर्यादित होता तो हा काळ. त्यामुळे चित्रपट अजून ‘बोलू’ लागायचा होता…! दशके लोटली, देशोदेशींच्या चित्रपट सृष्टीत बदल होत गेले, चित्रपटांत नवनवीन विषय हाताळले जाऊ लागले, तांत्रिकदृष्ट्या चित्रपट श्रीमंत होत गेला, चित्रपट बोलू लागला आणि मूकपटांचा कालखंड इतिहासजमा झाला.

सध्या त्याची आठवण निघायचे कारणही तसे नाही. पण हॉलीवूड मध्ये नवनवीन आणि विविध विषय हाताळायची एक चांगली सवय असल्यामुळे अनेकांगी पैलू असलेले चित्रपट हॉलिवूड मध्ये पाहायला मिळतात. “A Quiet Place” (अ क्वाएट प्लेस) हा असाच एक सर्वार्थाने उत्तम चित्रपट. सायन्स-फिक्शन या जॉनर मध्ये हॉलिवूडने मुशाफिरी करताना अनेक संस्मरणीय कलाकृती दिलेल्या आहेत. तरीही त्यामधील हा चित्रपट तितकाच उत्कंठावर्धक वाटतो.

पृथ्वीवर आता मनुष्यप्राणी विरळ झालाय. समस्त पृथ्वीवर आता परग्रहावरून आलेल्या, डोळे नसलेल्या परंतु अतिशय तीक्ष्ण श्रवणशक्ती असलेल्या परग्रहवासीयांचे राज्य आहे. या दृष्टिहीन तरीही अतिशय भीतीदायक प्राण्यांचा वावर सर्वत्र आहे. न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को वगैरे जागतिक महानगरे आता रिक्त पडलेली भकास ठिकाणे आहेत. त्याच आसपास निसर्गाने पुनः एकवार आपला कब्जा केला आहे. आणि त्याच जंगलरुपी जगात अबॉट कुटुंब राहत आहे!

वर उल्लेख केलेला मूकपटांचा काळ आठवण्याचे कारण, हा चित्रपट. संपूर्ण चित्रपटात कथेच्या मागणीनुसार अतिशय कमी किंवा जवळपास नाही म्हणावे इतपत संवाद आहेत. त्यामुळे जवळपास एक मूकपट पाहिल्याचा अनुभव अ क्वाएट प्लेस आपल्याला देऊन जातो. पती- ली अबॉट (जॉन क्राझिंस्की) पत्नी- एव्हलीन अबॉट (एमिली ब्लन्ट) मुलगी रेगन अबॉट ही बहिरी मुलगी आणि मार्कस अबॉट हा मुलगा असे कुटुंब. एक कुटुंब म्हणून एकसंध आणि एकत्र बांधले गेलेले दाखवताना काही सूचक प्रसंग आहेत.

आवाजावरून शिकारीचा वेध घेणारे धोकादायक एलियन्सचे प्रसंग अतिशय थरारकरित्या साकारले आहेत. अबॉट कुटुंबीय एकमेकांशी संवाद साधताना देखील सांकेतिक भाषेचा वापर करतात. शहरे ओस पडली असली तरीही अजूनही काही सुपरमार्केट मध्ये उपलब्ध असलेले समान आणण्यासाठी अबॉट कुटुंबीय जाताना दाखवलेले प्रसंग थरारक झालेत. निःशब्द, आवाज न करता शहरात जीव मुठीत धरून जाण्याचे प्रसंग सुंदररित्या साकारले आहेत. एव्हलीनची डिलिव्हरी जवळ आली असताना उद्भवलेला थरारक प्रसंग तर अत्यंत उत्कंठावर्धक झालाय. शिवाय एलियन्सचे आगमन कळावे म्हणून केलेल्या क्लुप्त्या तर निव्वळ लाजवाब!

अर्थात अशा चित्रपटांमागची वैज्ञानिक किंवा तांत्रिक बाजू लंगडी असून चालत नाही. हॉलिवूडची अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे कथानकाला साजेशा आणि पूरक तांत्रिक बाबी अतिशय खोलवर जाऊन मांडलेल्या असतात. किंवा कथानकाला असलेली तांत्रिक बाजू अत्यंत भक्कम असते. अशा प्रकारच्या चित्रपटांत त्या नावावर काहीही अतर्क्य दाखवून चालत नाही. त्यामुळे अन्य हॉलिवूड सायन्स फिक्शन चित्रपटांप्रमाणे अ क्वाएट प्लेस देखील उत्तम सायन्स फिक्शन पायावर उभा राहिला आहे.

जॉन क्राझीन्स्की आणि एमिली ब्लन्ट यांनी अभिनयात कमाल केली आहे. अशा ताणतणाव दाखवणाऱ्या भूमिकांत व्यक्तिरेखेचे अनेक गहिरे रंग असतात ते दोघांनीही अतिशय सुंदररित्या ते साकारले आहेत. एकही शब्द न बोलता केवळ मुद्राभिनयाच्या बळावर त्यांनी चित्रपट तोलून धरलाय. जॉन स्वतः चित्रपटाचा दिग्दर्शक असल्यामुळे त्याला हवा तसा हात त्याने चित्रपटावर फिरवला आहे. अभिनयाबरोबरच दिग्दर्शनात देखील त्याने उत्तम कामगिरी केली आहे. एकूणच A Quiet Place हा एक उत्तम चित्रपट पहिल्याचा आनंद देतो.