राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी; पोलीस काय भूमिका घेणार?

WhatsApp Group

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मशिदीवरील भोंग्यांबाबत घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच आता सांगलीतील शिराळा कोर्टाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट (Raj Thackeray Arrest Warant) जारी करण्यात आलं आहे.

एका जुन्या प्रकरणामध्ये हे वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ६ एप्रिल रोजी हे वॉरंट जारी करूनही अद्याप राज यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही कोर्टाने पोलिसांना विचारल्याचं सांगितलं जात आहे.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाला ४ मे रोजीचा अल्टिमेटम दिल्यामुळे वातावरण तापलं आहे. या प्रकरणी राज यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाविकास आघाडीतील काही नेत्यांसह सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयानेही अटक वॉरंट जारी केले होते. २००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणामध्ये गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले होते.

यानंतर राज ठाकरे यांना अनेकदा न्यायालयामध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.