धामापूर तलावातील मासे मोठ्याप्रणावर मृताअवस्थेत, पाण्याचा रंगही झाला काळसर

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जगप्रसिद्ध आणि शेकडो वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या श्री देवी भगवती मंदिराशेजारील असलेल्या धामापूर तलावामध्ये अचानक आणि मोठ्या प्रमाणावर लहान मोठे मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे.

अचानक मासे मृत होण्यामुळे संपूर्ण तलावाच्या काठावर मेलेले मासे तरंगत येऊन मृत माशांचा खच पडला आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. तसेच पाण्याचा रंगही काही प्रमाणात काळसर झाल्याचं स्थनिकांच्या निदर्शनास आले आहे.

धामापूर भगवती मंदिर आणि तलावाच्या सुमारे 450 ते 500 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच अशी घटना घडल्याचे स्थानिक जाणकार व्यक्तींनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तलावातील मासे मृत होण्याचे नेमके कारण अजून निश्चित समजले नाही.

धामापूर तलावातील पाणी धामापूर, काळसे, गावांसोबत संपूर्ण मालवण शहराला पिण्यासाठी नळयोजनेमार्फत पुरवण्यात येत. मात्र आता तलावामध्ये आणि काठावर लाखो मासे मरुन पाण्यावर तरंगत असल्यामुळे पाणी दूषित झाले असल्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.