पाकिस्तानात कराचीमध्ये बसला भीषण आग – 18 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

WhatsApp Group

पाकिस्तानमधील कराचीमध्ये बुधवारी (12 ऑक्टोबर) रात्री एका बसला भीषण आग लागली. बसमधील 18 प्रवासी जिवंत जाळले, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बस कराचीहून खैरपूर नाथन शाह परिसरात जात होती, मात्र सुपर हायवेवर नूरियााबादजवळ बसला आग लागली.

कराची बंदर शहराला हैदराबाद आणि सिंध प्रांतातील जामशोरो शहरांशी जोडणाऱ्या एम-9 मोटरवेवर ही घटना घडली. या बसमधून पूरग्रस्त लोक आपापल्या घरी जात होते. त्यावेळी हा अपघात घडला.

आगीत 18 जणांचा मृत्यू

संसदीय आरोग्य सचिव सिराज कासिम सूमरो यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जामशोरोचे जिल्हा आयुक्त आसिफ जमील यांनी सांगितले की, बसमध्ये प्रवास करणारे लोक पूरग्रस्त होते. हे सर्वजण दादू जिल्ह्यातील आपापल्या घरी परतण्यासाठी निघाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये जवळपास 35 लोक होते. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या मागील भागाला आग लागली आणि संपूर्ण बसला आग लागली. आगीपासून वाचण्यासाठी काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दादू जिल्हा हा सिंध प्रांतातील सर्वाधिक पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी एक आहे.