लडाखच्या नुब्रा उपविभागात शनिवारी कोसळलेल्या बांधकामाधीन पुलाच्या ढिगाऱ्यातून चार जवानांचे मृतदेह सापडले आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की लेह जिल्ह्यातील डिस्किट गावाजवळ बांधकामाधीन शत्से टकना पुलाचा एक भाग शनिवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे कोसळला आणि त्याच्या ढिगाऱ्याखाली सहा मजूर अडकले होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून चार मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 12 तासांच्या संयुक्त बचाव मोहिमेनंतर इतर दोघांची सुटका करण्यात आली आहे. ते म्हणाले की, वाचवलेले दोन्ही मजूर गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील राज कुमार आणि वरिंदर, छत्तीसगडमधील मनजीत आणि पंजाबमधील लव कुमार अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये राजौरी येथील कोकी कुमार आणि छत्तीसगड येथील राजकुमार यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आरके माथूर यांनी बचाव कार्याचे निरीक्षण केले. त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर लष्कराच्या स्थानिक 102 ब्रिगेड, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) च्या विजयक प्रकल्प आणि लेह येथील वायुसेना स्थानकावरून पाठविण्यात आलेल्या ऑपरेशनल सपोर्टसह बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले.