सातारा: आपल्या मूळ गावाकडून मुंबईकडे परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबतो…निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळते….आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधतात..आपुलकीने विचारपूस करतात…जिल्हा प्रशासनाला त्या वृद्ध दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश देतात…आणि मुख्यमंत्री मार्गस्थ होतात…
आपला संवेदनशील स्वभाव कृतीतून पुन्हा एकदा दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृद्ध दाम्पत्याचे पुनर्वसन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जमिनीवर खाली बसून त्या वृद्ध दाम्पत्याची आस्थेने चौकशी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत. त्याचवेळी पिंपरीतांब गावातील एका गरीब दाम्पत्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याचे निर्देश सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरे येथे वास्तव्यास असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तापोळा आणि दरे दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी एका ग्रामस्थाने त्यांना जवळच एक निराधार वृद्ध दाम्पत्य रहात असल्याचे निदर्शनास आणून दिले. क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांच्या भेटीला गेले.
पिंपरीतांब येथील भागडवाडीतील ७५ वर्षाचे विठ्ठल धोंडू गोरे आपल्या पत्नीसह याठिकाणी राहतात. त्यांची देखभाल करणार कुणीही नसल्याने आहे त्या तुटपुंज्या संसारात ते दोघं उघड्यावरच राहतात. मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांच्याजवळ गेले. थेट जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पावसाळ्यात तुम्ही अशा अवस्थेत कसे राहणार? त्याऐवजी गावाजवळ का राहत नाही असे त्यांना विचारले. मात्र त्यावर त्यांनी काहीही ठोस उत्तर दिले नाही. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी या दाम्पत्याला पावसाळ्यात लागेल तेवढे अन्न धान्य आणि मदत देण्याचे निर्देश दिले. अशा ठिकाणी राहत असल्याने त्यांना अचानक मदत लागल्यास कुणीही मदत करू शकणार नाही त्यामुळे गावाजवळ राहावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी त्यांना केली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या वृद्ध दाम्पत्याचे त्वरित पुनर्वसन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच पदाचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा आपल्या पदाचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी कसा वापर करता येईल, याचाच विचार करतात आणि ते कृतीतून ते दाखवतात. पिंपरीतांब येथील भागडवाडीतील विठ्ठल गोरे यांना मदत करताना त्यांच्यातली हीच संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.