
मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटाची न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. आज 22 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. मात्र यात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची? यावरील उत्तर ऐकण्यासाठी नागरिकांनी आणखी एक दिवसाचा वेळ लागणार आहे.
त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार नाही. उद्या ऐवजी सुनावणी 23 ऑगस्ट, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या यादीनुसार, 23 ऑगस्ट रोजी सुनावणीची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी पार पडली होती. या सुनावणीमध्ये बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई थेट शिवसेना नेमकी कोणाची? उद्धव ठाकरेंची की, शिंदे गटाची या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचली होती. यावर कोर्टानं महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं नोंदवला. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, असं सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.