सर्वसामान्यांच्या हितासाठी गतीने निर्णय घेणारे सरकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
WhatsApp Group

बुलढाणा: राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख निर्णय घेण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ जनतेच्या व्यापक हिताच्या निर्णयाला प्राधान्य देण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावरून उतरून मदत करणारे सरकार आहे. येत्या काळातही सर्वसामान्याच्या हितासाठी गतीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

येथील कऱ्हाळे ले आऊटजवळील मैदानात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आज पार पडला. यावेळी पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सुरू केल्यापासून शासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत आहे. राज्यात सातत्याने कार्यक्रम घेण्यात आले आहे. यातून आतापर्यंत १ कोटी ६१ लाख नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. या उपक्रमातून नागरिकांच्या दारापर्यंत जाणारे देशातील एकमेव राज्य आहे. अभियानातून बुलढाणा जिल्ह्यात आजच्या दिवशी १ लाख तर आतापर्यंत १७ लाख ४३ हजार नागरिकांना लाभ देण्यात आला आहे.

राज्य शासन जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. गेल्या काळात बंद पडलेल्या असंख्य योजना नव्याने पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. ३२ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. यातून आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. नदीजोड प्रकल्प, दुष्काळग्रस्तांना मदत, महिलांना बस प्रवासात सवलत, ७५ हजार पदभरती असे हिताचे निर्णय घेण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या मदतीने राज्याचा विकास करण्यात येत आहे. महिलांच्या विकासासाठी बचतगटांना चालना देण्यात येत आहे. बचतगटांना स्वस्त व्याजदराची कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच विपणनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक

जालना जिल्ह्यात घडलेली घटना दुर्देवी आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. आवश्यकता भासल्यास न्यायालयीन चौकशी करण्यात येऊन यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यासोबतच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन मदत देण्यात आली. तसेच मेहकर तालुक्यातील ५० तलाठी कार्यालयांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमावर आधारित कॉफी टेबलबुकचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांची भाषणे झाली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी प्रास्ताविक केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वाटप

कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात लाभ देण्यात आले. यात सुनीता प्रशांत खरे, रा. सुंदरखेड, ता. बुलडाणा, (पिठाची चक्की), राजू भीमराव हिवाळे, रा. भीमनगर वार्ड, क्रमांक दोन, बुलढाणा, (वाहन करातून सूट), हरिदास काळमेघ, रा. काकोडा, ता. संग्रामपूर, (विमा संरक्षण निधी), टी. एस. घुले, कुलाभवानी फार्मर प्रोड्युसर कंपनी, रा. वडगाव पाटण, ता. जामोद, (ड्रोन), रामेश्वर मदनराव कोल्हे, रा. धोडप, ता. चिखली, (सामाजिक कल्याण), ज्योती निलेश पाटील, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली, (कुकुट पालन), चंद्रकला मनोहर सोनवणे, बुलडाणा, (आत्मनिर्भर निधी), शितल पंडीत खंडागळे, रा. कोलवड, ता. बुलडाणा, (प्रधानमंत्री मातृवंदन योजना), भूषण विनायक काळे, रा. राऊतवाडी, ता. चिखली, (अनुकंपा नोकर भरती), सविता गजानन आंधळे, रा. खामगाव, (राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय), प्रभाकर शंकर पहूरकर, रा. भानेगाव, ता. शेगाव, (प्रधानमंत्री मत्स्य योजनेतून इन्सुलेटेड वाहन), प्रियंका गजानन ताटे, रा. बुलडाणा, (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम), लता कृष्णा गवते, रा. चिखली, (ई-व्हेईकल), अनुराधा सोळंकी, रा. पाटोदा, ता. चिखली, (खेळाचे अद्ययावत साहित्य), सुमेध तायडे व कीर्ती तायडे, रा. संग्रामपूर, (सामुदायिक विवाह), पी. पी. सोनुने, रा. मलकापूर, (स्मार्ट प्रकल्प), उषा विजय मिसाळ, रा. बुलडाणा, (नागरी जीवनोन्नती अभियान), सरला गजानन जाधव, रा. कोलवड, (ग्रामीण जीवनोन्नती), निर्मला देशमुख, रा. मेहकर, मंगला शेजोळ, रा. देऊळगाव माही (ट्रॅक्टर), प्रथमेश जवकर, रा. बुलडाणा, (खेळाचे साहित्य), ऋषीकेश ढारे, रा. शेगाव, अर्चना जाधव, रा. वरवट बकाल, ता. संग्रामपूर, राहुल लोखंडे, रा. भालगाव, ता. चिखली (रोजगार मेळावा) या लाभार्थ्यांना लाभ देऊन गौरविण्यात आले. तसेच चंद्रयान मोहिमेत योगदान देणारे उद्योजक गितीका जयेश विकमशी आणि राजेंद्र भोसले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत विविध साधनांचे वितरण बचत गट, एफपीओ व वैयक्तिक लाभार्थींना करण्यात आले. जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथील कुलभवानी शेतकरी उत्पादक कंपनीला ड्रोन फवारणी यंत्र महाडीबीटीअंतर्गत ४० टक्के अनुदानावर देण्यात आले. त्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कंपनीचे टी एस घुले यांना प्रदान करण्यात आले. ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, हार्वेस्टर आदी अनुदान तत्वावरील अनेक उपसाधने वितरित करण्यात आली.

शिबिरात विविध शासकीय विभागातर्फे ५० दालनांद्वारे शासकीय योजनांच्या माहितीचे प्रदर्शन करण्यात आले. मुद्रांक नोंदणी कक्षाचे उद्धाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे लोकार्पण

बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या नवीन सुसज्ज इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इमारतीचे लोकार्पण आणि कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर त्यांनी इमारतीची पाहणी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ, पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर आदी उपस्थित होते. नव्या इमारतीमध्ये शहर पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरीता सुसज्ज कक्षांचे निर्माण करण्यात आले आहे. ४ कोटी खर्चून ही इमारत बांधण्यात आली आहे.