नागपूर : हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू

WhatsApp Group

नागपुरमध्ये बुधवारी हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडत असताना एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपुरात बुधवारी (18 जानेवारी) सकाळी 10 वाजता डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. आरती मदन गुरव (वय 19 वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

आरती ही भंडारा जिल्ह्यातील सातोना गावची रहिवासी होती. शिक्षणासाठी ती हिंगणा तालुक्यातील टाकळाघाट येथे मावशीकडे राहायची. आरती डोंगरगावजवळील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. बुधवारी सकाळी ती टाकळाघाट येथून गुमगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकावरून रेल्वे स्थानकाकडे निघाली. यावेळी आरती हेडफोन लावून मोबाईलवर बोलत होती.

iPhone Offer: फक्त 12,200 रुपयांमध्ये iPhone खरेदी करण्याची संधी!

रेल्वे गेटजवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना आरती गुरव फोनवर बोलण्यात मग्न होती, तिला ट्रेनचा आवाज आला नाही. स्टेशनवर धडधडणारी ट्रेन इतर लोकांनी पाहिली. लोकांनी जोरात ओरडून आरतीला सांगण्याचा प्रयत्न केला. पण हेडफोन घातलेल्या आरतीला त्यांचा आरडाओरडा ऐकू आला नाही आणि भरधाव वेगात असलेल्या पुणे-नागपूर ट्रेनने तिला 50 फूट पुढे नेल्याने तिचा चिरडून मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक पथकासह दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास एसएचओ विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.