सावंतवाडी जिमखाना मैदानावरील खेळपट्टीसाठी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर

WhatsApp Group

सावंतवाडी – सावंतवाडी जिमखाना मैदानावरील खेळपट्टी साठी निधी मिळावा याकरिता आम्ही ठराव घेतला होता. त्यानंतर वैशिष्टपूर्णमधून त्यासाठी १६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत अशी माहिती सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. तसेच मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचेही संजू परब यांनी आभार मानले आहेत.

संजू परब यावेळी बोलताना म्हणाले, सावंतवाडीतील जनतेचा व मुख्यत्वेकरून क्रिकेटपटूंच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या जिमखाना मैदानावरील खेळपट्टी साठी आम्ही नगरपालिकेमध्ये निधी मिळण्यासाठी ठराव मंजूर केला होता व तो प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी हा विषय सातत्याने लावून धरल्यामुळे आज अखेर सावंतवाडीकरांना जे हवे ते मिळाले आहे.

विशेष म्हणजे मला देखील याबाबत आनंद आहे की हा ठराव आम्ही पालिकेमध्ये असताना घेतला होता तो आज मंजूर होऊन आला आहे, त्यामुळे मी सावंतवाडीकरांचे यासाठी नक्कीच अभिनंदन करेन असेही संजू परब यावेळी बोलताना म्हणाले.

सावंतवाडीतील जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला होता व जे प्रेम व साथ दिली त्यामुळेच ही कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले व त्याचे फलित म्हणून अखेर हा निधी मंजूर झाला आहे असं संजू परब म्हणाले आहेत.