उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी भडकली आग, पुजाऱ्यांसह 13 जण होरपळले

WhatsApp Group

सोमवारी सकाळी महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात आग लागली, त्यात पुजाऱ्यासह 13 जण होरपळले. भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावून पूजा करण्यात आली. दरम्यान अचानक आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की मंदिरात उपस्थित पुजारी आणि 13 जण जखमी झाले. मंदिर प्रशासनाने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचार सुरू आहेत. मात्र, आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले.

मंदिराच्या गर्भगृहात आग लागल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आरतीवेळी मंदिर परिसरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वजण महाकाल मंदिरात होळीचा सण साजरा करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या गर्भगृहात आरती होत असताना गुलाल उधळला जात होता, त्यावेळी कुणीतरी पुजारी संजीव यांच्यावरही गुलाल उधळला. त्यावेळी त्यांच्या हातात आरती होती. गुलालातले रसायन आगीत मिसळले गेल्याने आग भडकली असावी असा अंदाज आहे. मात्र, प्रशासनाने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

आगीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नीरज सिंह आणि एसपी प्रदीप शर्मा हे सर्व प्रथम रुग्णालयात पोहोचले. तसेच महत्वाचे म्हणजे सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.