केरळ पोलिसांनी मंगळवारी जेलर चित्रपट अभिनेता विनायकनला अटक केली आहे. दारूच्या नशेत पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचा आरोप त्याच्यावर होता. मंगळवारी संध्याकाळी त्याच्या अपार्टमेंटमध्ये झालेल्या वादानंतर अभिनेत्याला एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावले. याठिकाणी त्याने एकच गोंधळ घातला. पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसाठी त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, तो सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्टेशनवर पोहोचला आणि त्याने पोलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला काही काळ सहन केले पण अभिनेत्याचे अपमानास्पद वर्तन सुरूच राहिल्याने पोलिसांना त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा लागला.
शहर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह पाच पोलीस दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास शहरातील स्टेडियम लिंक रोडलगत असलेल्या विनायकन यांच्या अपार्टमेंटमध्ये गेले होते. आपल्या पत्नीसोबत आर्थिक बाबींवरून झालेल्या कथित भांडणाबद्दल अभिनेत्याने स्वतः पोलीस ठाण्यात फोन केला होता. मात्र, पोलिसांनी येऊन ओळखीचा पुरावा मागितला असता त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.