खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. शिंदे गटनेते योगेश बेलदार यांच्या फिर्यादीवरून नाशिक न्यूजच्या पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीची बदनामी करून मुख्यमंत्रीपदाच्या प्रतिष्ठेला कलंक लावल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेत बंडखोरी करून ठाकरे गटातून शिंदे गटात आलेले शिवसैनिक योगेश बेलदार यांनी संजय राऊत यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शिवसेनेमधील बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. सध्या संपूर्ण राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही ठाकरे आणि शिंदे गटातील तणाव वाढला आहे. शिवसेनेचे पक्ष चिन्ह आणि शिंदे गटाचे नाव आल्यानंतर ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्याविरुद्धचा हा पहिलाच गुन्हा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल (रविवार) पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचा समाचार घेतला. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरले.