
नाशिक: शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष सावरण्यासाठी कंबर कसली आहे. पक्ष वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता राज्यभर फिरण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तांतरानंतर पहिल्यांदाच बुलढाण्यामध्ये सभा घेतली. दरम्यान आता पक्ष वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची चर्चा सुरू झाली आहे.
येत्या मंगळवारी ठाकरे गटातील 12 माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची शिंदे गटाकडून तयारी सुरू आहे. उद्या सोमवारी नाशिकचे 12 माजी नगरसेवक मुंबईमध्ये दाखल होतील. त्यानंतर मंगळवारी वर्षा निवासस्थानावर 12 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.