40 वर्षांच्या महिलेने दिले 44 मुलांना जन्म; पतीने सोडल्यानंतर एकटी करतेय मुलांचा सांभाळ

WhatsApp Group

आई होणे ही निःसंशयपणे कोणत्याही महिलेसाठी आनंददायी अनुभूती असते, परंतु जेव्हा तुम्हाला युगांडातील (Uganda) एका महिलेबद्दल माहिती मिळेल तेव्हा, तुम्ही नक्कीच म्हणाल की आई होणे या महिलेसाठी अजिबात आनंददायी नसेल. आपण ज्या महिलेबद्दल बोलत आहोत तिने 40 वर्षांच्या वयात 44 मुलांना जन्म दिला आहे. होय, ऐकायला थोडे विचित्र आहे परंतु हे सत्य आहे. या महिलेचा नवरा तीला सोडून गेला असून, सध्या ती एकटी या सर्व मुलांचा सांभाळ करत आहे. मरियम नबतान्झी (Mariem Nabatanzi) असं या महिलेचं नाव आहे.

न्यूयॉर्क पोस्ट वेबसाइटच्या अहवालानुसार, युगांडातील रहिवासी 43 वर्षीय मरियमने 4 वेळा जुळ्या मुलांना, 5 वेळा तिळ्यांना आणि 5 वेळा एकच वेळी चार मुलांना जन्म दिला आहे. असे एकदाच घडले आहे जेव्हा तिने तिच्या एका प्रसूतीमध्ये फक्त एका मुलाला जन्म दिला. मरियमच्या 6 मुलांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान तिचा नवरा सर्व पैसे घेऊन पळून गेला. आता ती तिच्या 38 मुलांसह राहते, यामध्ये 20 मुले व 18 मुलींचा समावेश आहे. ती एकटी आपल्या मुलांचे पालनपोषण करत आहे.

मरियम 12 वर्षांची असताना तिच्या कुटुंबीयांनी तीला लग्न करून विकले. वयाच्या 13 व्या वर्षी तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. जेव्हा तिने एकाच वेळी 2, 3 आणि 4 मुलांना जन्म देण्यास सुरुवात केली तेव्हा ती काळजीत पडली. याबाबत ती डॉक्टरांकडे गेली होती. तपासाअंती असे आढळून आले की तिचे शरीर अत्यंत प्रजननक्षम आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे तिचे अंडाशय इतर महिलांच्या तुलनेत असामान्यपणे मोठे आहे. या स्थितीला हायपर ओव्हुलेशन असं म्हणतात.

याबाबत डॉक्टरांनी सांगितले की सामान्य गर्भनिरोधक पद्धती मरियमसाठी काम काम करणार नाहीत, उलट यामुळे तिला आणखी अनेक समस्या उद्भवू शकतात. या स्थितीचे कारण आनुवंशिकता आहे. डॉक्टरांनी सांगितले की तिच्या बाबतीत अंडाशय एकाच वेळी अनेक अंडी रिलीज करते, यामुळे, एकाच वेळी अनेक मुले होण्याची शक्यता वाढते. तिने 3 वर्षांपूर्वी शेवटच्या मुलाला जन्म दिला, तेव्हापासून डॉक्टरांनी तिला अधिक मुले होण्यास सक्त मनाई केली आहे.