विरार – ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना मुंबईजवळच्या विरारमध्ये (Virar) घडली आहे. येथे एका दोन वर्षांच्या मुलाच्या अंगावरुन कार (Car) गेली, मात्र सुदैवाने चिमुरड्याला कोणतीही दुखापत झाली नाही. गाडी गेल्यानंतर दुसऱ्या बाजूने हा लहान मुलगा चालत बाहेर आला. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील गार्डनर एव्हेन्यू या सोसायटीमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे.
कारखालून बाहेर पडणारा मुलगा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये (CCTV Camera) कैद झाला आहे. २३ फेब्रुवारी रोजीची ही घटना आहे. चिमुरडा या घटनेतून बचावला असला तरी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेजबाबदार कार चालक मनोज यादव आणि कारमध्ये बसलेल्या नैना सावंत यांच्या विरोधात बर्डे कुटुंबीयांनी भारतीय दंड कलम २७९, ३३७ आणि मोटरवाहन अधिनियम १८७ अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे.