आंघोळ करताना हिटरचा शॉक लागल्याने 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

WhatsApp Group

जळगाव – जळगाव जिल्ह्यामधील (jalgaon) ममुराबाद येथील एका 13 वर्षीय मुलाचा हिटरच्या धक्क्याने (water heater) जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे लग्न घरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव मुकुंदा पाटील (वय-१३) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. मुकूंदा दामू पाटील हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. मुकूंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्यामुले घरात लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.

मुकूंदा पाटील आणि त्यांची पत्नी दिपाली पाटील हे दोघेही भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रणव हा घरी एकटाच होता. दुपारच्या दरम्यान बाथरूममध्ये बादलीत हिटर लावला होता. त्यानंतर बाजूलाच प्रणव अंघोळ करण्यासाठी बसला. अचानक त्याला विद्यूत हिटरचा धक्का लागल्यामुले प्रणवचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, लग्नात आलेले रवींद्र पाटील हे घरी आले असता हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने नातेवाईकांना कळविले.

मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.