धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थ्याची घरी गळफास घेऊन आत्महत्या

WhatsApp Group

औरंगाबाद येथून धक्कादायक बातमीसमोर आली आहे. औरंगाबादमध्ये परीक्षेच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या काही तासाआधी फाशी देत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. ही घटना एन 8, सिडको भागातील गुरुनगर हौसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बारावीची परीक्षा आजपासून (21 फेब्रुवारी) सुरू झाली आहे. बारावीच्या परीक्षा (Exam) देण्यासाठी हजारो विद्यार्थी सज्ज झाले आहेत. मात्र, बारावीची परीक्षा सुरू होण्याआधी ही धक्कादायक घटना घडली आहे.

14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता 12 वी साठी एकूण तीन हजार 195 केंद्रांवर 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 3 लाख 21 हजार 396 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता यावी यासाठी मंडळामार्फत सप्टेंबर महिन्यात संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले, तर परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येऊन प्रवेशपत्र देखील ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आले.

‘कोविड’च्या प्रादुर्भावानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून परीक्षा निकोप पार पडाव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय मंडळस्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सवलती देण्यात येत असून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाची मदत घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.