
Bus Accident in Poonch : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. बस अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूंछमधील सावजियान भागात मिनी बसचा अपघात झाला. बस खड्ड्यात पडल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, लष्कराचे बचावकार्य सुरू आहे. बस अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडाही वाढू शकतो.
अनेक जखमींना मंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, बस पूंछ जिल्ह्यातील सावजियानहून मंडीकडे जात असताना हा अपघात झाला.
बसमध्ये 36 प्रवासी होते
बस अपघातानंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक लोकही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. अधिका-यांनी सांगितले की, लष्कर, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांचे संयुक्त बचाव अभियान सुरू आहे. त्यांनी सांगितले की, 36 प्रवाशांना घेऊन ही बस गली मैदानातून पूंछच्या दिशेने जात असताना सावजियांच्या सीमावर्ती भागातील बरारी नाल्याजवळ बसला अपघात झाला.
उपराज्यपालांनी जाहीर केली भरपाई
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पूंछमधील रस्ते अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांनाही भरपाई जाहीर करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.