महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत मिळणार 1866.40 कोटी रुपयांचा लाभ

WhatsApp Group

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 1866.40 कोटी रुपयांचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, गुरुवार, 27 जुलै 2023 रोजी देण्यात येणार आहे. हा निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएमकिसान) योजनेंतर्गत त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जाईल.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी, केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति हप्ता रु. 2000/- च्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष रु. 6000/- चा लाभ दिला जात आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PMKISAN) अंतर्गत देय असलेल्या 14व्या हप्त्याचा (एप्रिल, 2023 ते जुलै, 2023) लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाईल. खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा खरेदीसाठी ही रक्कम निश्चितच उपयुक्त ठरेल आणि कृषी उत्पादन वाढीला चालनाही मिळेल.

फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून, 110.53 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. 23731.81 /- कोटींचा लाभ हस्तांतरित झाला आहे.

महाराष्ट्रातील एकूण 85.66 लाख पात्र लाभार्थी  शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीसाठी सिकर येथे होणाऱ्या समारंभात अंदाजे रु. 1866.40/- कोटी रुपयांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल.

केंद्र सरकारने या योजनेचा लाभ आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 88.92 लाख लाभार्थ्यांची बँक खाती आधार लिंक्ड लाभांच्या रकमेसाठी नोंदणी करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी संबंधित बँकेला भेट द्यावी आणि केंद्र सरकारच्या विनंतीनुसार प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभ मिळविण्यासाठी आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेकडे आवश्यक अर्ज सादर करण्याचे सूचित केले आहे.

या सोहळ्याला, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायन व खते आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविय उपस्थित राहणार आहेत. परिसरातील शेतकरी कृषी विज्ञान केंद्र (KVK) येथे https://pmindiawebcast.nic.in लिंक वापरून या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील.