
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्य बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेला राजकीय धुरळा अद्याप खाली बसायचा आहे. तोवरच महाराष्ट्राला लागूनच असलेले राज्य गोव्यातही राजकीय (Goa Politics) भूकंप होण्याची शक्यता आहे. गोवा (Goa) राज्यातही महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे पॅटर्न (Eknath Shinde Pattern) पहायला मिळण्याची शक्यता आहे. गोवा काँग्रेसमधील 11 पैकी जवळपास 8 आमदार भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षातील हे सर्व आमदार आजच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
भाजप श्रेष्ठींकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत आहे. आज गोव्यातील राजकीय हालचाली गतीमान होणार असल्याचं सांगितलं जात आहे. गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून आज सायंकाळपर्यंत दहा आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार 11 जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शनिवारी या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यांच्याकडून आमदारांचं मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, पश्चिम बंगालमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे तीन विद्यमान आमदार तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे.