कोरोना रुग्णांसाठी ७ दिवसांचं विलगीकरण अनिवार्य का असतं?

WhatsApp Group

कोरोनाची लक्षणं असल्यावरही रॅपिड अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्याचा सल्ला नागरिकांना आयसीएमआरने दिला आहे. सध्या देशात ३१२८ टेस्टिंग लॅबोरेटरीजमध्ये दररोज कोरोनाच्या २० लाखांवर चाचण्या केला जात आहेत.डेल्टा, ओमिक्रॉननंतर सातत्यानं कोरोनाचे नवनवे व्हॅरियंट पुढे येत आहेत. अशात कोरोनापासून बचावासाठी मास्क, सॅनिटाझरचा वापर आणि सामाजिक अंतर या त्रिसुत्रींबरोबरच गृह विलगीकरणाचं पालन अत्यंत महत्वाचं आहे. सुरवातीला कोरोना रुग्णांना १४ दिवसांचं विलगीकरण महत्वाचं होतं. मात्र, आता योग्य खबरदारी घेऊन रुग्णांना किमान ७ दिवसांचं विलगीकरण बंधनकारक करण्यात आलं आहे.

कोरोना विषाणूने शरिरात प्रवेश केल्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना टेस्ट केल्यास ती निगेटिव्ह येईल, कारण या विषाणूचा संपूर्ण शरिरात फैलाव व्हायला वेळ लागतो, अशी माहिती आयसीएमआरने एका पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळेच गृह विलगीकरण किमान ७ दिवस आवश्यक असल्याचं आयसीएमआरने म्हटलं आहे.

रॅपिड अँटिजन टेस्ट आणि होम अँटिजन टेस्ट विषाणुच्या संपर्कात आल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून ते आठव्या दिवसापर्यंत कोरोना झाल्याचं निदान करु शकतात. तर आरटीपीसीआर चाचणीतून २० दिवसांपर्यंत कोरोना विषाणूचं निदान करणं शक्य आहे. शरिरातील सक्रीय आरएनए पार्टिकल्समुळे कोरोना चाचणीचे निकाल आठव्या दिवसानंतरही पॉझिटिव्ह येऊ शकतात.

लक्षणं असल्यावरही रॅपिड अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्याचा सल्ला नागरिकांना आयसीएमआरने दिला आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सुचनांनुसार TrueNat, CBNAAT,CRISPR,RT—LAMP आणि रॅपिड मॉल्युक्युलर टेस्टच्या साहाय्यानेही कोरोनाचं निदान केलं जाऊ शकतं. सध्या देशात ३१२८ टेस्टिंग लॅबोरेटरीजमध्ये दररोज कोरोनाच्या २० लाखांवर चाचण्या केला जात आहेत.

ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांनी काय खबरदारी घ्यावी?

ओमिक्रॉनची लक्षण आढळल्यास तात्काळ टेस्ट करणं महत्वाचं आहे. टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत गृह विलगीकरण आवश्यक आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास नवीन नियमांनुसार ७ दिवसांचं क्वारंटाईन अनिवार्य आहे.

‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका!

ओमिक्रॉन संक्रमित व्यक्तीला सतत थकवा जाणवू शकतो. अंगदुखीसह तीव्र डोकेदुखीही ओमिक्रॉनचं मुख्य लक्षण आहे. याशिवाय घशात खवखव आणि सर्दीचा त्रासही उदभवू शकतो. दरम्यान, एम्सच्या अभ्यासातून ओमिक्रॉनची आणखी नवी लक्षणं समोर आली आहेत. ऑक्सिजन लेव्हल कमी होणं, छातीत त्रास, श्वास घेण्यास अडचण, मेंटल कन्फ्युजनसारख्या तक्रारी असल्यास ओमिक्रॉनची शक्यता नाकारता येत नाही.

ओमिक्रॉनची टेस्ट किट बाजारात…

तुम्हाला ओमिक्रॉनची लक्षण आढळल्यास त्याचं निदान आता तात्काळ करणं शक्य आहे. टाटा मेडिकलने विकसित केलेली ओमिक्रॉनची टेस्ट किट OmiSure द्वारे तुम्ही चाचणी करु शकता. नाक किंवा तोंडातून स्वॅब घेऊन ही टेस्ट करता येते. या टेस्टचा फायनल रिपोर्ट १० ते १५ मिनिटात येतो. टाटा मेडिकलनं प्रति टेस्ट २५० रुपये दर निश्चित केला आहे. ही घरगुती टेस्ट नसल्यानं प्रयोगशाळांकडून अतिरिक्त पैसेही आकारले जाऊ शकतात.

– रेणुका शेरेकर