मुंबई: काँग्रेसने गुरुवारी रात्री उशिरा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली, ज्यामध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या सात जागांसाठी (7 Congress candidates declared) उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली.
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत छत्रपती शाहूजी महाराजांचे नाव असून, त्यांना कोल्हापुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. गुरुवारीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली होती. रवींद्र धंगेकर यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. सोलापूरमधून काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या जागेवर निवडणूक लढवत असत. गोपाळ पाडवी यांना आदिवासीबहुल आणि राखीव जागा नंदुरबारमधून रिंगणात उतरवण्यात आले असून, येथे त्यांचा सामना भाजपच्या उमेदवार हिना गावित यांच्याशी होणार आहे. तर बळवंत वानखेडे हे अमरावती या राखीव जागेतून उमेदवार असतील. नांदेडमधून वसंतराव चव्हाण आणि लातूरमधून शिवाजीराव काळगे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आले आहे.
विधानसभेच्या रिक्त झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघातून साजिद खान पठाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभेच्या जागेसाठी 26 मे रोजी निवडणूक होणार आहे. गोवर्धन शर्मा यांचे वयाच्या 74 व्या वर्षी 4 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झाल्याने ही जागा रिक्त होती.\
भाजपने राज्यातील लोकसभेच्या 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरात, तर राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनीही निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. रामटेक, नागपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे.