मध्य प्रदेशातील काँग्रेसची अडचण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मंगळवारी पुन्हा एकदा पक्षाला मोठा धक्का बसला. विजयपूर विधानसभेतील काँग्रेसचे आमदार रामनिवास रावत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. रामनिवास रावत यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा आणि माजी मंत्री नरोत्तम मिश्रा उपस्थित होते. रामनिवास रावत हा मध्य प्रदेशातील ओबीसींचा मोठा चेहरा मानला जातो.
यापूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विदिशा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवराज सिंह चौहान म्हणाले होते की, काँग्रेस आमदार रामनिवास रावत मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व घेणार आहेत. यावेळी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेसची अवस्था वाईट झाली असल्याचे सांगितले. त्यांचेच लोकसभेचे उमेदवार पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
#WATCH | Madhya Pradesh: 6-time MLA Ramniwas Rawat quits Congress and joins the BJP, in Sheopur, in the presence of CM Mohan Yadav. #LokSabhaElections2024 pic.twitter.com/CmpvqzT2of
— ANI (@ANI) April 30, 2024
काँग्रेसवर साधला निशाणा
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसमध्ये ताकद उरली नाही, जे थोडे होते ते मोहन यादव आणि भाजपने नष्ट केले आहे. माजी मुख्यमंत्री चौहान पुढे म्हणाले की, लाडली बहना योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगणाऱ्या मुख्यमंत्री मोहन यादव यांचे मी आभारी आहे. ही नुसती लाडकी बहिण नाही, आता आपल्याला करोडपती बहीण बनवायची आहे.
इंदूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. याआधीही अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नुकतेच कमलनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या छिंदवाडा येथील काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काँग्रेसला अनेक धक्के दिले आहेत.