भिवंडी शहरात 15 जूनच्या दरम्यान शोरमा खाल्ल्याने 107 जणांना विषबाधा झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी पुन्हा विषबाधेचे प्रकरण घडले आहे. लागोपाठ घडलेल्या या घटनांनी भिवंडी महानगर पालिका आणि संबंधित यंत्रणांचे धाबे दणाणले आहे. ताज्या घटनेत वंजारी नाका परिसरातील ए.के. शोरमा शॉप येथे चिकन शोरमा खाल्याने मंगळवारी दुपारनंतर अनेकांना अन्न विषबाधेचा प्रादुर्भाव जाणवू लागला.सुरवातीला एकाच कुटुंबातील चार जणांची तब्येत बिघडली. त्यांना दुपारी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हळूहळू ही संख्या वाढत जाऊन रात्री 34 जणांना रुग्णालयात आणले, तर बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ही रुग्ण संख्या 56 वर पोहचली आहे.या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे .रुग्णांना शोरमा खाल्ल्यानंत उलटी,जुलाब आणि थंडी ताप याचा त्रास जाणवत असून त्यावर उपचार सुरू आहेत.
शहरात उघड्यावरील खाद्य पदार्थांच्या विक्रीवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. महिन्यांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने त्रास झाल्याने 107 रुग्णांना अन्न विषबाधा झाली होती.नागरिकांनी सुद्धा उघड्यावरील खाद्य पदार्थ खावू नयेत घरात शिजवलेले सकस अन्न खावे.विशेष म्हणजे एक वर्ष वयाच्या मुलाला आणि गरोदर महिलेला देखील विषबाधा झाली आहे हे गंभीर असून त्यामुळे नागरिकांनी सुद्धा खबरदारी घ्यावी असे आवाहन स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिक डॉ.माधवी पंदारे यांनी केले आहे.
