वैभव नाईक यांना पाडण्यासाठी उदय सामंतांकडून विरोधी उमेदवाराला 50 लाखाची मदत; राऊतांचा गौप्यस्फोट

WhatsApp Group

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकारणीची बैठक काल कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. विनायक राऊत म्हणाले, महाराष्ट्रात कुठेही न घडत असलेले अत्यंत घाणेरडे राजकारण रत्नागिरीतील पालीच्या घरातून उदय सामंत करत आहेत. गेल्या अडीच वर्षात पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम उदय सामंत यांनी केले. एवढेच नाही तर आमदार वैभव नाईक यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला 50 लाख रुपये दिले. त्याही पुढे जाऊन वैभव नाईक यांना कुठेतरी दुसरीकडे स्थिरस्थावर करूया आणि मालवण तालुक्यातील त्यांच्या आडनाव बंधूला पक्षामध्ये घेऊन त्याला आमदार करूया अशी मागणी उदय सामंत यांनी माझ्याकडे सातत्याने केली. मात्र भाडोत्री लोकांना घेण्यापेक्षा वैभव नाईक हे सिंधुदुर्गचे वैभव आहेत तेच आमदार होणार असे स्पष्ट करुन उदय सामंत यांची मागणी धुडकावून लावली असल्याचा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला.

यावेळी कणकवली येथे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते संदेश पारकर, अतुल रावराणे, बाळा गावडे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, बाळा भिसे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके,देवगड तालुकाप्रमुख जयेश नर,रामू विखाळे,हर्षद गावडे,उप जिल्हा प्रमुख नंदू शिंदे, सुजित जाधव,राजू राणे, राजू राठोड,कन्हैया पारकर,कणकवली शहर प्रमुख उमेश वाळके, मीनल तळगावकर,वर्षा पवार,विदेही गुडेकर,स्वरूपा विखाळे आदि उपस्थित होते.

विनायक राऊत पुढे म्हणाले, सामंत पालकमंत्री असताना किती टक्केवारी घ्यायचे हे सर्वज्ञात आहे. वॉटर प्युरिफायर घोटाळ्यातील चौकशी अहवालात त्यांच्या स्विय सहाय्याचे नाव होते.शिवसेनेने आवाज उठवूनही याची पारदर्शक चौकशी झाली नाही. मात्र या घोटाळ्यातील सहभागी असलेल्यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. प्रत्येक जि. प. मतदारसंघामध्ये प्रत्येकी २ हजाराची नोंदणी व्हायलाच हवी. सिंधुदुर्गात अतिरिक्त विमान सोडावे,यासाठी मी मंत्री ना.ज्योतीरादित्य सिंधीया यांच्याकडे पाठपुरावा केला होता मात्र त्याचे श्रेय दुसरेच घेत आहेत.असेही राऊत म्हणाले.

वैभव नाईक म्हणाले,मागील काही दिवसांतील घडामोडीत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे राहीले तेच कट्टर शिवसैनिक आहेत. वास्तविक पक्षात फुट पडली असली तरी अनेकांचे पक्षप्रवेश होत आहेत, हीच शिवसेनेची ताकद आहे. यापूर्वी केसरकर, सामंत यांच्या मंत्रीपदाचा आपणाला किती फायदा झाला हे सर्वांनाच माहिती आहे. वास्तविक मी कुडाळ मालवणमधून उभा राहीलो तेव्हा टेबल लावायला देखील कार्यकर्ते नव्हते, तरीही जिंकलो.आता तर तशी परिस्थिती नाही आपण सर्वानी मेहनत घेऊन येणाऱ्या निवणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे.गरज लागेल तिथे मी आपल्या पाठीशी राहीन. जोमाने कामाला लागा. लोकांशी संपर्क वाढवा असे आवाहन त्यांनी केले.