निवडणुकांचं बिगुल वाजलं; ५ राज्यांमधील राजकीय समीकरणं काय?

WhatsApp Group

देशात सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. अनेक राज्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे. अशा स्थितीत ५ राज्यांमधील निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता होती. मात्र, कोरोनाबाबतची खबरदारी बाळगून या निवडणुका घेऊ, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर या राज्यांमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यान विविध टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. तर सर्व राज्यांमधील मतमोजणी १० मार्चला होणार आहे. या निवडणुकांकडे मिनी लोकसभा म्हणून देखील पाहिलं जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान होणाऱ्या या निवडणुका निवडणूक आयोगासाठी मोठं आव्हान असणार आहे.

उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता जाणार का?

केंद्रीय सत्ताकारणाच्या दृष्टीकोनातून उत्तर प्रदेश या राज्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या राज्यात ४०३ जागांसाठी ७ टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल. उत्तर प्रदेशात सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आहे. बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी मुख्य विरोधकांच्या भूमिकेत आहे. समाजवादी पार्टी आरएलडी, सुभासपा, प्रसा, जनवादी पार्टीसह काही अन्य पक्षांच्या सोबतीनं निवडणूक लढवत आहे. काँग्रेसच्या दिग्गजांचे मतदारसंघ असलेल्या या राज्यात काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ७ जागा जिंकता आल्या होत्या. यंदा प्रियंका गांधीच्या नेतृत्वात काँग्रेस भाजपचा सामना करणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उ. प्रदेशचा दौरा केला. यादरम्यान विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. मोदी-योगींच्या जोडगोडीच्या करिष्म्याची भुरळ पुन्हा मतदारांना पडणार का? हे निवडणूक निकालांमधून स्पष्ट होईलच.

पंजाबचा गड भाजपला जिंकता येईल का?

पंजाबमधील दौऱ्यादरम्यान एका फ्लायओव्हर पंतप्रधानांचा ताफा काही काळ खोळंबल्यानं झालेल्या केंद्र-राज्य सरकार वादाची घटना सध्या ताजीच आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नींच्या नेतृत्वात काँग्रेस सरकार सत्तेत आहे. भाजप माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग आणि सुखदेव ढिंढसांबरोबर हातमिळवणी करुन रिंगणात उतरणार आहे. सुखबिर सिंग बादल यांच्या शिरोमणी अकाल दलानं बसपबरोबर युती केली आहे. या राज्यात आम आदमी पार्टीनंही जम बसवला आहे. पंजाबमधील ११७ विधानसभा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

उत्तराखंडमध्ये सत्ता कुणाची?

विधानसभेच्या ७० जागांसाठी उत्तराखंडमध्ये निवडणूक होणार आहे. २०१७ मध्ये ५७ जागा जिंकून भाजपनं सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला केवळ ११ जागांमध्ये समाधान मानावं लागलं होतं. या सत्ताकाळात भाजपनं अनेकदा मुख्यमंत्री बदलले. सध्या पुष्करसिंह धामी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत.

गोव्यात भाजपसमोर तृणमुलचं आव्हान?

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ४० पैकी सर्वाधिक १५ जागा जिंकुनही काँग्रेस सत्ता स्थापन करु शकली नव्हती. भाजपनं मगोप आणि इतर पक्षांच्या सोबतीनं गोव्याची सत्ता काबीज केली. सध्या गोव्यात भाजपचे डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री आहेत. या राज्यात काँग्रेस आणि भाजपला यंदा ममता बँनर्जींच्या तृणमुल काँग्रेसचंही आव्हान असणार आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवारही खातं उघडण्याच्या तयारीत असतील.

मणिपुरात भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत

मणिपुरात विधानसभेच्या ६० जागा आहेत. गेल्या निवडणुकीत २८ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. तर भाजपनं २१ जागांवर विजय मिळवला होता. गोव्याप्रमाणे या राज्यातही भाजपनं काँग्रेसला छोबीपछाड केलं. भाजपनं एनपीपी, एलजेपी आणि अपक्ष आमदारांच्या समर्थनात सत्ता स्थापन केली. सध्या एन. बिरेंद्र सिंह मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत.

– रेणुका शेरेकर