जागतिक मंदीचा सर्वात मोठा परिणाम जगभरातील नोकऱ्यांवर झाला आहे. एकीकडे नवीन नोकऱ्यांच्या संख्येत मोठी घट होत असताना दुसरीकडे छाटणीचा वेग अनेक पटींनी वाढला आहे. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज डिस्ने (Disney Layoffs 2023) ने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांची छाटणी करण्याची योजना आखली आहे. बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, डिस्ने एप्रिल महिन्यापर्यंत 4,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांना कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. मात्र आतापर्यंत ही माहिती समोर आलेली नाही की कंपनी कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे.
डिस्नेने आधीच 7,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे
वॉल्ट डिस्नेने एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी फेब्रुवारी 2023 मध्येही कंपनीने 7,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर यांनी ही दुसरी टाळेबंदीची योजना बनवली आहे. बॉब इगर यांनी फेब्रुवारीमध्ये कंपनीच्या वेतनात कपात करण्याची घोषणा केली. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले होते की, या पाऊलाद्वारे कंपनी अब्जावधी डॉलर्सची बचत करण्याचा प्रयत्न करत आहे. फेब्रुवारीमध्ये टाळेबंदीनंतर, डिस्ने पुन्हा एकदा एप्रिलमध्ये टाळेबंदीची दुसरी फेरी करण्याची योजना आखत आहे. या संदर्भात अद्याप कंपनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
डिस्ने सदस्यांमध्ये सतत घट
डिस्नेच्या 2021-22 च्या वार्षिक अहवालानुसार, कंपनी त्या वर्षापर्यंत एकूण 1.9 लाख लोकांना रोजगार देत होती. यातील 80 टक्के कर्मचारी पूर्णवेळ काम करत होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या तिमाहीत प्रथमच डिस्नेच्या ग्राहकांमध्ये कपात झाली आहे. कंपनीच्या एकूण ग्राहकांच्या संख्येत एकूण 1 टक्के घट झाली आणि ग्राहकांची संख्या 168.1 दशलक्ष झाली. दुसरीकडे, नेटफ्लिक्सबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या तिमाहीत वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, डिस्नेने आपल्या गुंतवणूकदारांना शेवटच्या तिमाहीच्या निकालानंतरच आपला तोटा कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते.
कंपन्यांमध्ये छाटणी सुरूच आहे
डिस्ने व्यतिरिक्त, अनेक मोठ्या कंपन्यांनी यापूर्वी टाळेबंदीच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत. यामध्ये टेक कंपनी गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा, ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन अशा अनेक कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हकालपट्टी केली आहे.