IND vs ENG 3rd ODI: भारत-इंग्लंड यांच्यात आज फायनल; विराटला शेवटची संधी?

WhatsApp Group

IND vs ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात इंग्रजांनीही प्रत्युत्तर देत रोहित ब्रिगेडचा पराभव केला. आता टीम इंडियाला हा निर्णायक सामना जिंकून मालिका जिंकायची आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने पहिल्या वनडेत शतकी भागीदारी केली होती. पण लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही खेळाडू फ्लॉप ठरले. विराट कोहलीसारखे फलंदाजही काही विशेष करू शकले नाहीत, त्यामुळे भारतीय संघ 146 धावांत संपुष्टात आला. भारतीय संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या गोलंदाजांचा फॉर्म. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत, तर फिरकीपटू युझवेंद्र चहलही दुसऱ्या वनडेत चार विकेट्स घेत फॉर्ममध्ये आला आहे.

भारताने आतापर्यंत 12 खेळाडूंना संधी दिली आहे. दुखापतीमुळे विराट कोहली पहिल्या वनडेत खेळू शकला नाही. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळाली. पण भारताने हा सामना 10 गडी राखून जिंकला. यामुळे अय्यरला फलंदाजीची संधी मिळाली नाही. दुसऱ्या सामन्यात कोहली परतला आणि अय्यरला बाहेर जावं लागलं. त्यामुळे या सामन्यात विराटच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जात असलेली एकदिवसीय मालिका सध्या 1-1ने  बरोबरीत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं 10 विकेट्स राखून जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 100 धावांनी पराभव केला. ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाणारा हा एकदिवसीय सामना निर्णायक असेल. या सामन्यात भारत कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

इंग्लंडचा संघ –  जोस बटलर(कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कारर्स, रीस टोपली.

भारताचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा. लाइव्ह टीव्ही