मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करा अशी मागणी करत राज्यभरातील ST कर्मचारी सध्या आंदोलन करत आहेत. उच्च न्यायालयाने यावर समिती स्थापन करून योग्य निर्णय घेऊ असे सांगितले, मात्र तरीही कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आता एसटी महामंडळाकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच निलंबन करायला सुरवात केली आहे.
राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाविरोधात एसटी महामंडळाने आता मोठी कारवाई करण्यास सुरवात केली आहे. संपावर असलेल्या 376 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या संपामध्ये राज्यभरातील 45 आगारातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने जीआर काढूनही हा संप मागे न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
महामंडळाने आता कर्मचाऱ्यांविरोधात कठोर निर्णय घेतला असून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात उद्या एसटी महामंडळ अवमान याचिका दाखल करणार आहे. आज तांत्रिक अडचणीमुळे याचिका पूर्ण होऊ न शकल्यानं उद्या ही याचिका दाखल करण्यात येणार आहे.