मुंबई: मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून 25 टक्के सवलत त्यांना मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातफे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रिप किंवा 60 ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल.
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे तर महिलांना सुद्धा एसटी बसमधून 50 टक्के प्रवास सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी आशा आहे.
कोणाला सवलत मिळेल?
ही सुविधा 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, इयत्ता 12 वीपर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. या 3 श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन), सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.
या सर्व सवलती मेट्रो लाइन 2 ए आणि 7 च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्रे दिल्यावर मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला 30 दिवसांची वैधता राहील. मुंबई 1 कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल.