तुर्की-सीरियात हाहाकार! भूकंपामुळे आतापर्यंत 24 हजार लोकांचा मृत्यू

WhatsApp Group

तुर्की आणि त्याच्या शेजारी देश सीरियामध्ये, 6 फेब्रुवारी 2023 रोजी, 7.8 तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपाने कहर केला आहे. आतापर्यंत दोन्ही देशांतील मृतांचा आकडा 24 हजारांच्या पुढे गेला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. या विध्वंसाच्या दरम्यान, भारतातील एनडीआरएफचे पथक बचावासाठी तुर्की आणि सीरियामध्ये पोहोचले आहे आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. एका 6 वर्षीय मुलीला वाचवल्यानंतर एका 8 वर्षीय मुलीला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात NDRF जवानांना यश आले आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे 4 दिवसांनी ही मुलगी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, एनडीआरएफची टीम तुर्की लष्कराच्या जवानांसह गाझियानटेप प्रांतातील नूरदगी शहरात बचाव कार्य करत आहे. पथकाने या भागातील ढिगाऱ्यातून सुमारे 13 मृतदेह बाहेर काढले आहेत. तुर्कस्तानच्या प्रभावित भागात 7 फेब्रुवारीपासून दलाचे बचावकार्य सुरू आहे. 6 फेब्रुवारीच्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने तुर्कस्तान आणि सीरियाला मदत पुरवण्यासाठी ऑपरेशन सुरू केले.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये २४ वर्षांनंतर सर्वात भयंकर भूकंप झाला आहे. यापूर्वी 1999 मध्ये उत्तर-पश्चिम तुर्कीमध्ये भूकंपामुळे विध्वंस झाला होता, ज्यामध्ये 17,000 लोकांचा मृत्यू झाला होता. 2023 च्या भूकंपामुळे हजारो इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण बचावकर्ते अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा बाधित भागात शोध घेत आहेत. यानंतरही तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. भूकंपानंतर आतापर्यंत 100 हून अधिक आफ्टरशॉक बसले आहेत.