Chitrarath Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात झळकणार 23 चित्ररथ

WhatsApp Group

26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात कर्तव्य पथावर एकूण 23 चित्ररथाच्या- 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशाच्या तर 6 विविध मंत्रालये/विभागाच्या माध्यमातून देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा यांचे दर्शन घडणार आहे.

आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, लडाख, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचे 17 चित्ररथ प्रदर्शित केले जाणार आहेत, ज्यामाध्यमातून देशाच्या भौगोलिक आणि समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवले जाईल.

संस्कृती मंत्रालय, गृह मंत्रालय (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल), गृह मंत्रालय (अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो), गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग), आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (इंडियन कौन्सिल अॅग्रीकल्चर रिसर्च अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद) या मंत्रालयांचे आणि विभागांचे सहा चित्ररथांचेही प्रदर्शन यावेळी केले जाईल ज्यामधून त्यांची गेल्या काही वर्षातील कामे आणि उपलब्धी यांचे दर्शन घडेल.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांची निवड क्षेत्रीय आधारावर करण्यात आली आहे, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे उत्तर विभाग, मध्य विभाग, पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग आणि उत्तर पूर्व विभाग अशा सहा झोनमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. साधारणपणे, प्रत्येक झोनच्या प्रमाणानुसार,प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून अंदाजे 15 चित्ररथांची निवड केली जाते.

या निवड प्रक्रियेमध्ये, तज्ञ समितीद्वारे विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडील चित्ररथ प्रस्तावांची छाननी आणि राज्यांच्या प्रतिनिधींसोबत चित्ररथाची संकल्पना, सादरीकरण, सौंदर्यानुभव आणि तांत्रिक घटकांवर समितीच्या सदस्यांनी केलेल्या संवादाच्या अनेक फेऱ्यांचा समावेश असतो.